तान्हा पोळ्यानिमित्त त्रिमूर्ती देवस्थानात बालगोपालांच्या नंदीबैलांचे आकर्षक प्रदर्शन

 तान्हा पोळ्यानिमित्त त्रिमूर्ती देवस्थानात बालगोपालांच्या नंदीबैलांचे आकर्षक प्रदर्शन









वरोरा (प्रती) तान्या पोळ्याच्या निमित्ताने साईनगर येथील त्रिमूर्ती देवस्थान परिसरात बालगोपालांसाठी नंदीबैल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक संस्कृती आणि बालमनातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनात साईनगर परिसरातील जवळपास ५० ते ५५ बालगोपालांनी आपापले आकर्षक नंदीबैल सजवून मंदिर परिसरात आणले. रंगीबेरंगी सजावट, विविध प्रकारचे अलंकार आणि पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आलेले नंदीबैल यामुळे त्रिमूर्ती देवस्थान परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांसह नागरिकांनीही या प्रदर्शनाला भेट देत बालगोपालांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.

तान्हा पोळा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीशी जोडलेला महत्त्वाचा सण असून, या परंपरेची ओळख बालपिढीपर्यंत पोहोचावी आणि मुलांमध्ये आपल्या लोकपरंपरेविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उत्कृष्ट नंदीबैलांना बक्षिसे

प्रदर्शनातील नंदीबैलांचे मूल्यमापन श्री. सोनारकर सर आणि श्री. प्रमोद उरकुडे सर यांनी केले. सजावट, आकर्षकता, कल्पकता आणि पारंपरिक स्वरूप आदी बाबींचा विचार करून उत्कृष्ट नंदीबैलांची निवड करण्यात आली.

यामध्ये कबीर चेतन शर्मा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अन्वी नक्षी हिने द्वितीय, तर कुमारी पिसे हिने तृतीय क्रमांक मिळविला. उत्कृष्ट तीन नंदीबैलांना त्रिमूर्ती देवस्थानच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. तसेच बालगोपालांचा उत्साह वाढावा यासाठी श्री. सोनारकर सर यांच्या वतीने दोन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

शर्मा परिवाराकडून बालगोपालांना खाऊ वाटप

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना साईनगर निवासी श्री. चंदनलाल कुंदनलाल शर्मा परिवाराच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बालगोपालांच्या आनंदात आणखी भर पडली. मुलांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत आपल्या नंदीबैलांचे प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्रिमूर्ती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. डाहुले साहेब, देवस्थानचे सर्व पदाधिकारी तसेच साईनगर निवासी चेतन शर्मा, प्रमोद उरकुडे, सोनारकर सर, बांदुरकरजी, अमोल पिसे, मोटके बंधू, आगलावे सर, हेमंत डफ आणि नितीन शर्मा यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. प्रमोद उरकुडे सर यांनी केले. बालगोपालांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे नंदीबैल प्रदर्शन उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments