42 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शिपाई पदावरून भारतभाऊ सेवानिवृत्त

 42 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शिपाई पदावरून भारतभाऊ सेवानिवृत्त

    






वरोरा (प्रती) आनंदवनाची नवलाई काही आगळी वेगळीच असते.1983 मध्ये प्रशिक्षणासाठी आनंदवनात आलेला एक अस्थिव्यंग मुलगा व्यवस्थापकांच्या नजरेत भरतो आणि आनंदवनात  नव्याने सुरू होत असलेल्या अपंग व मूकबधिरांसाठीच्या आनंद अपंग व मूकबधिर विद्यालय आनंदवन या शाळेत काळजीवाहक म्हणून निवडला जातो , वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी . आपल्या कामाने, सहकारी वृत्तीने  सर्वांची मने जिंकतो . वसतिगृहातील मूकबधिर, अस्थिव्यंग, अंध मुलांमध्ये स्वतःला हरवतो. त्यांचे दुःख, वेदना यांच्याशी एकरूप होऊन मित्रत्वाचे, बंधुत्वाचे , विश्वासाचे नाते निर्माण करून सर्वांचा लाडका 'भारतभाऊ' होतो . तो 'भारत रामराव दोडके' , भद्रावतीजवळील चोरा येथील त्याचा जन्म. शेतीकाम, गुरेढोरे चारणारा भारत आनंदवनात आला आणि कायमचा आनंदवनचा झाला.

     पुढे शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून इयत्ता 10 वी  झाल्यानंतर 1995 मध्ये पदबदली करून शाळेत शिपाई पदावर रूजू झाला . तरी वसतिगृहात त्याचे निवासस्थान असल्याने मुलांशी- पालकांशी नाळ जुळून राहिली. सकाळी 5 :00   वा. स्वतः उठावे, मुलांना उठवावे, सकाळची तयारी , मुलांच्या  आंघोळी याकडे लक्ष द्यावे,  याव्यतिरिक्त शाळा परिसराची स्वच्छता त्यानंतर शिपाई म्हणून शाळा कार्यालयातील कामे करणे व पुन्हा संध्याकाळी मुलांच्या आई-वडीलांचे फोन स्विकारून मुलांशी बोलणे करून देणे व मुलांना अभ्यासाला बसवणे , एखादा मुलगा आजारी असल्यास त्याची सेवासुश्रूषा करणे व इतर अनेक दिवसभराची कामे कोणताही थकवा किंवा कपाळावर आट्या न आणता त्यांनी आनंदाने केली. त्यामुळे विद्यार्थी,पालक, शिक्षक, कर्मचारी, संस्था यासर्वांचा तो आवडता होता. दि. 31/08/2026 ला त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केल्याने नियत वयोमानानुसार त्यांना सेवानिवृत्ती देण्यात आली.

       या निमित्ताने आनंदवनातील अंध व मूकबधिर मुलांच्या मेसमध्ये त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. 'महारोगी सेवा समिती वरोरा 'चे विश्वस्त मा. सुधाकर कडू सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. शाळेचे मुख्याध्यापक मा. विजय भसारकर, वसतीगृह अधिक्षक श्री.अमोल देशमुख, अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. वर्षा उईके मॅडम, संधिनिकेतन उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राचे निदेशक मा. मसराम सर, संस्थेचे राजेश ताजने, सेवानिवृत्त शिक्षक मा. नागेश्वर गेडाम व सामाजिक कार्यकर्त्ता मा. गुलाब शेंडे मंचावर उपस्थित होते. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. घुलक्षे सर यांनी प्रास्ताविकातून भारत दोडके यांचा जीवनपट उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका सीमा बावणे यांनी केले. मूकबधिरांच्या सांकेतिक भाषा खूणा पद्धतीने  हा कार्यक्रम मूकबधिर मुलांपर्य॔त पोहोचवण्याचे कार्य श्री. खामनकर सर, श्री. ताटे सर व सौ. कडू मॅडम यांनी केले. वाचा उपचार तज्ज्ञ श्री. घोलप सर , मुख्याध्यापक श्री. भसारकर सर व मंचावरील प्रमुख पाहुण्यांनी मनोगतातून  भारतभाऊच्या सेवेचा गुणगौरव केला. 

   मा. अध्यक्ष महोदयांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ' माणूस द्या मज माणूस द्या... '  व श्रद्धेय बाबा आमटे यांच्या ' माणूस माझे नाव...   दहा दिशांच्या रिंगणात या पुढेच माझी धाव ... ' या काव्यपंक्ती उद्धृत करत भारतभाऊंनी माणूसपण जपले म्हणून ते सर्वांना आपले वाटतात अशी प्रशंसा केली. 

     या सत्कार समारंभाला आनंदवनातील दिव्यांगाच्या तीनही शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा.डाॅ.विकासभाऊ आमटे, मा.डाॅ. भारतीताई आमटे यांचे आशीर्वाद लाभले.  संस्थेचे सहसचिव मा. कौस्तुभ दादा व पल्लवीताई यांच्या सदिच्छा प्राप्त झाल्या. शाळेचे शिक्षक श्री. देवडे सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments