वरोरा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
तीन पोलीस कर्मचारी जखमी
वरोरा (प्रती) वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने तपास कक्षात स्वतःवर धारदार लोखंडी टोच्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीला रोखण्याच्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
फसवणुकीच्या गुन्ह्यात विनोद शामराव सोयाम (वय 40) याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. फसवणुकीची रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार, हवालदार संदीप मुळे, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर आणि तक्रारदार रूपेश मुल्लेमवार यांचे पथक त्याला घेऊन मध्य प्रदेशातील भोपाळ येथे गेले होते.
मात्र बैतुलजवळ पोहोचल्यानंतर आरोपीने फसवणुकीच्या पैशांबाबत स्पष्ट माहिती दिली नाही. पोलिसांना त्याने केवळ पोलीस कोठडीचा कालावधी वाढवण्यासाठी दिशाभूल केल्याचा संशय आल्याने पथक भोपाळचा प्रवास रद्द करून वरोरा येथे परतले.
सायंकाळी सुमारे पाच वाजता पथक पोलीस ठाण्यात परतल्यानंतर आरोपीला तपास कक्षात नेऊन पैशांबाबत चौकशी करण्यात आली. यावेळी आरोपीने पोलिसांना आव्हान देत टेबलावर ठेवलेला लाकडी मूठ असलेला धारदार लोखंडी टोचा हातात घेतला आणि स्वतःवर वार करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार, हवालदार संदीप मुळे आणि पोलीस अंमलदार विशाल राजुरकर यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. झटापटीत आरोपीच्या पोटाला व मानेवर दुखापत झाली. त्याच वेळी आरोपीला वाचवताना तिन्ही पोलिसांच्या हातांनाही जखमा झाल्या.
पोलिसांनी आरोपीच्या हातातील टोचा काढून घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर आरोपी आणि जखमी पोलिसांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारानंतर आरोपीला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.
या घटनेप्रकरणी आरोपी विनोद सोयाम याच्याविरुद्ध तपासात अडथळा निर्माण करणे, फसवणुकीची रक्कम जप्त होऊ नये यासाठी दबाव आणणे आणि आत्महत्येचा प्रयत्न करून पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण करणे या आरोपांखाली भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 226 आणि 125(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गौरकार करत आहेत.
0 Comments