विद्यार्थ्यांनी सतत कार्य मग्न असावे-प्रा जोशी
उन्हाळी शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रतिपादन
वरोरा (प्रती)
विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासाकरिता स्वतःला सतत गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे विविध कलांचा विकास होऊन पुढे विद्यार्थी कलासक्त जीवन जगू शकतात असे प्रतिपादन शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील प्रा विकास जोशी यांनी केले. लोकशिक्षण संस्थेद्वारा आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील, कला अकादमीचे अध्यक्ष मंगेश मल्हार, सुवर्णरेखा पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रा श्रीकांत पाटील यांनी संस्थेद्वारा चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेत उन्हाळी शिबिराचे महत्त्व अधोरेखित केले. या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळ आणि कलेची आवड निर्माण होते व बुद्धीला चालना मिळते असे ते म्हणाले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनी व कला प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. विविध खेळ आणि कला विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी लाठी -काठी चे प्रात्यक्षिक, क्रीडा नृत्य, विविध आसने, सूर्यनमस्कार संस्कृत संभाषण, योग नृत्य आदी कलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. बँकॉक येथील योगासन स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेच्या शौनक आमटे, राम झाडे, श्रीकांत घाणवडे आणि सई नेवासकर या योगपटूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता उरकांदे तर परिचय प्रीती चिडे यांनी करून दिला. संचालन मंजुषा धोबे, प्रीती चिडे व मीनाक्षी ठेंगणे यांनी केले. आभार लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक संजय आंबुलकर यांनी मानले.

0 Comments