वरोऱ्यात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १४ डिसेंबर रोजी सुश्रुत हॉस्पिटल, माधवबाग वरोरा व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, वर्धा यांचा संयुक्त उपक्रम

 वरोऱ्यात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

१४ डिसेंबर रोजी सुश्रुत हॉस्पिटल, माधवबाग वरोरा व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, वर्धा यांचा संयुक्त उपक्रम




वरोरा प्रतिनिधी :

स्थानिक नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्यजागरूकतेसाठी सुश्रुत हॉस्पिटल व माधवबाग वरोरा तसेच महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वि. एम. टॉवर, रिलायन्स स्मार्ट पॉइंटसमोर, बोर्डी चौक, वरोरा येथे होणार आहे.


चंद्रपूर व वरोरा परिसरातील विविध रोगतज्ज्ञ व सुप्रसिद्ध सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिबिरात नागरिकांसाठी मोफत तपासणी, तसेच उपचारांवर सवलतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.


या शिबिरात मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसील, शरीरातील गाठी, जखमा, जळजळ व वेदना यांची तपासणी व सल्ला, डोळ्यांचे विकार व नजरेची तपासणी, मेंदू व मणक्याचे आजार, कान–नाक–घसा तपासणी, बालरोग व नवजात शिशु तपासणी, मधुमेह (शुगर) व इतर चयापचय विकार, तसेच हृदयविकार व रक्तविकारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आवश्यक त्या उपचारांवर सवलत व पुढील शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शनही दिले जाणार आहे.


शिबिरात डॉ. शीतल आसुटकर (शस्त्रक्रिया तज्ज्ञ, सर्जरी विभाग प्रमुख, महात्मा गांधी रुग्णालय वर्धा), डॉ. शिवानी ढवस (कान–नाक–घसा), डॉ. शेंडे (नेत्ररोग तज्ज्ञ), डॉ. वसंत ढवस (बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ), डॉ. राकेश अंबाटी (किडनी विकार तज्ज्ञ), डॉ. सोहेल काझी (मेंदू व मणक्याचे विकार तज्ज्ञ) आणि डॉ. रागिणी राव अंबाटी (मधुमेह व इतर विकार तज्ज्ञ) हे नामांकित डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.


या आरोग्य शिबिराचे आयोजन सुश्रुत हॉस्पिटल व माधवबाग वरोरा टीम, डॉ. पवन डोंगरे व डॉ. सौ. मन्जुषा डोंगरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments