सात वर्षांच्या लढ्यानंतर बहिणीला न्याय
वरोरा (प्रती)वडिलोपार्जित संपत्तीतून अन्यायाने वगळण्यात आलेल्या बहिणीला तब्बल सात वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर न्याय मिळाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कल्पना ताटकुंडवार (बोंदगुलवार)यांच्या नावाची ७/१२ उताऱ्यावर पुन्हा नोंद करण्यात आली.
वरोरा येथील रहिवासी असलेल्या कल्पना ताटकुंडवार
यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या भावांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने सातबारा उताऱ्यावरून केवळ अडीच महिन्यात प्रक्रिया करून त्यांचे नाव वगळले होते. यामुळे त्यांना वडिलोपार्जित संपत्तीपासून बेदखल करण्यात आले. सदर प्रकार लक्षात येताच कल्पना ताटकुंडवार यांनी महसूल व पोलीस विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर वरोरा पोलिसांनी त्यांच्या
तीन भावांसह तीन बहिणींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. दरम्यान, वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळावा यासाठी त्यांनी २०१९ मध्ये वरोरा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने शेगाव बुयेथील सर्वे क्रमांक ३०९ ३१९ व ३७१ मधील मालमत्तेवर कल्पना ताटकुंडवार यांचा हक्क मान्य केला.
तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता कलम ५४ नुसार संपत्तीची वाटणी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर १६ मार्च २०२६ रोजी फेरफार प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या नावाची सातबारा उताऱ्यावर अधिकृत नोंद करण्यात आली. सात वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या न्यायामुळे समाधान व्यक्त होत असून कल्पना ताटकुडवार, यांच्या वतीने अड. बी. यू. निखाडे यांनी बाजू मांडली.
.jpg)
0 Comments