नंदोरी शेतशिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 2.38 लाखांचा मुद्देमाल जप्त

 नंदोरी शेतशिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 2.38 लाखांचा मुद्देमाल जप्त



वरोरा (प्रती )– वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नंदोरी शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. सदर घटना ही नुकतीच घडली असून या कारवाईत चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण २ लाख ३८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदोरी परिसरात काही इसम पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तात्काळ छापा टाकला. कारवाईदरम्यान जुगार खेळताना चार आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये गजानन माळी (वय ३०), गणेश हिवरकर (वय २२), राहुल अवगाण (वय २१) आणि कैलास मधुकर धवस (वय ३६, सर्व रा. नंदोरी) यांचा समावेश आहे.

आरोपींकडून रोख रक्कम १४ हजार ६०० रुपये, पाच मोटारसायकल (किंमत अंदाजे २ लाख २० हजार रुपये) तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ३८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, संतोष बाकल उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरोऱ्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख सपोनी शरद एस .भस्मे, सुकराज यादव, दीपक मोडक, महेश गावतुरे, सौरभ कुलथे, दिलीप वाळवे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments