लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची छेड
आरोपीला 24 तासांत बेड्या
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
वरोरा : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला जखमी करणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाचा अवघ्या २४ तासांत शोध घेऊन शेगांव पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. गणेश बाळुराम कुमावत (३४) रा. बासडी खुर्द, जि. जयपूर, राजस्थान; सध्या रा. बोर्डा, ता. वरोरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास टेमुर्डा परिसरात पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात होती. दरम्यान, आरोपीने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. काही अंतर पुढे गेल्यावर आरोपीने तिची छेड काढली. या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या पीडितेने चालत्या दुचाकीवरून उडी मारली, ज्यामध्ये ती जखमी झाली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी शेगांव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ सह पोक्सो कायद्याच्या
कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे हलवली. कोणतीही प्राथमिक माहिती नसताना पोलिसांनी टेमुर्डा, वरोरा आणि परिसर पिंजून काढला. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शेगांव पोलिसांनी अत्यंत कौशल्याने २४ तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन गणेश कुमावत याला ताब्यात घेतले.गहन चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून आरोपीला अटक केली आहे.
ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगांवचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव, पोउपनी दिलीप पोले, पोउपनी सुमित कांबळे, सफौ दिलीप सुर, पोहवा अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार आणि प्रशांत गिरडकर यांनी पार पाडली.

0 Comments