प्रभाग १ (ब) मध्ये बदलाचा नव्या आशेचा चेहरा – चंद्रकांत रामदास कुंभारे

 प्रभाग १ (ब) मध्ये बदलाचा नव्या आशेचा चेहरा – चंद्रकांत रामदास कुंभारे



वरोरा (प्रति) वरोरा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १ (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे उमेदवार चंद्रकांत रामदास कुंभारे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहताच या प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला आणि पुरोगामी, सामाजिक कार्याचा मोठा अनुभव असलेला कुंभारे हा नवा, सुशिक्षित आणि विचारसरणीने दृढ उमेदवार म्हणून मतदारांमध्ये चर्चेत आहे.


फुले–शाहू–आंबेडकर यांच्या प्रगतशील विचारसरणीवर श्रद्धा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील कार्य, तसेच मराठा सेवा संघासह विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे कुंभारे यांनी वार्डात सामाजिक बांधिलकीची ठोस छाप उमटवली आहे.


वार्डातील लोकजागर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीनदुबळ्यांना मदत, आर्थिक सहकार्य, संकटात आधार आणि संस्कृती–सर्व धर्मसमभावाचे संतुलित विचार मांडण्याचे काम सातत्याने केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विज्ञानवाद आणि अध्यात्मिक तत्त्वांचा प्रभाव त्यांच्या कार्यशैलीत ठळकपणे दिसून येतो.


गेल्या पाच वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असून, राष्ट्रवादी ओबीसी संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक बळ मजबूत केले. पक्षातील सक्रियता आणि कार्याचा वेग लक्षात घेता, केवळ एका वर्षातच पक्षाने त्यांची दखल घेतली. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाने प्रेरित आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलासभाऊ नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्थानिक अध्यक्षपदाची धुरा सांभाळत हा प्रभाग नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला.


या प्रभागात दलित आणि मागास समाजाचे प्रमाण मोठे असून बदलाची हाक वारंवार उमटताना दिसते. “लोकांच्या इच्छेनुसार मी रिंगणात उतरलो आहे. विकासाच्या माध्यमातून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे माझे ध्येय आहे,” असे कुंभारे सांगतात.


मतदारांमध्ये दुसरीकडे एक भावना दृढ होताना दिसते — सुशिक्षित, सक्षम आणि सामाजिक कार्यात सातत्य राखणारा उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे कुंभारे यांच्या बाजूने कल झुकत असल्याचे राजकीय वर्तुळातील चर्चेतून स्पष्ट होते.


यंदाची निवडणूक या प्रभागात बदलाची दिशा ठरवणारी ठरेल, असा सूर नागरिकांमध्ये उमटू लागला आहे. मतदारांनीही “कुंभारेच आमचे प्रतिनिधी व्हावेत” अशी अपेक्षा व्यक्त केली असून, या निवडणुकीत नवीन नेतृत्वाची नांदी होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

Post a Comment

0 Comments