मीनाक्षी कुंकुले : सामाजिक परंपरेचा वारसा आणि नव्या नेतृत्वाची उमेदवार
वरोरा (प्रति) काँग्रेस पक्षाच्या प्रभाग 2 (ब) गटातून प्रथमच राजकारणाच्या रिंगणात उतरलेल्या मीनाक्षी सुधाकर कुंकुले या एक साधी, शांत स्वभावाची पण सामाजिक कार्यातून घडलेली उमेदवार म्हणून आज वरोऱ्यात ओळख निर्माण करत आहेत. शिक्षण दहावीपर्यंत झाले असले, तरी अनुभव, समंजसपणा आणि लोकांशी असलेली निगडीतता या गुणांमुळे त्यांनी स्वतःचे स्थान समाजाच्या मनात आधीच पक्के केले आहे.
शीतलामाता मंदिराच्या सदस्या म्हणून धार्मिक क्षेत्रात त्यांनी सहभाग नोंदवला असून त्यांच्या कार्यामागे सतत उभे राहिलेले प्रेरणास्थान म्हणजे त्यांचे पती सुधाकर कुंकुले. स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम करताना त्यांनी राजकारणाचा लोकाभिमुख चेहरा अनुभवला.
गेल्या काही वर्षांत छावा ग्रुप संघटनेच्या माध्यमातून शहरात अनेक उपक्रम राबवले गेले. शिवजयंती, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव अशा सांस्कृतिक पर्वांतून सामाजिक एकोपा वाढवण्याचे कार्य त्यांनी केले; तर पुरोगामी विचारधारेचे महापुरुष त्यांच्या कार्याची प्रेरणा बनले.
रक्तदान शिबिरे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले महिला मेळावे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅग वितरण, होतकरू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप—या सर्व उपक्रमांतून समाजाशी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ झाले. लोकमान्य टिळक गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुधाकर कुंकुले यांनी अनेक जनहिताचे उपक्रम राबवले असून त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना झाला आहे.
सामाजिक सेवेतूनच त्यांचे जनसंपर्क वाढत गेले आणि त्यातून आज मीनाक्षी कुंकुले या एक मजबूत उमेदवार म्हणून उदयास येत आहेत. वरोरा शहरात पती सुधाकर कुंकुले यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लौकिक असल्यामुळे मीनाक्षींची निवडणूक ही सहज जिंकण्यासारखी आहे, अशी चर्चा जनमानसात आहे.

0 Comments