लोकशिक्षण संस्थेच्या परिसरात वाचक संमेलन- ग्रंथ मेळाव्याचे आयोजन

 लोकशिक्षण संस्थेच्या परिसरात वाचक संमेलन- ग्रंथ मेळाव्याचे आयोजन 

वरोरा (प्रति)



    'असे वाचक घडलो आम्ही ' या यशस्वी उपक्रमाची वाटचाल करीत लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या परिसरात दोन दिवसीय 'वाचक संमेलन आणि ग्रंथ मेळाव्याचे' आयोजन २१ व २२ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.

      लोकशिक्षण संस्थेचे हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या वाचक संमेलनामध्ये २१ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता शहरातून ग्रंथदिंडी निघणार आहे. सायंकाळी ४ वा. संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, उद्घाटक म्हणून डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर प्रमुख अतिथी कविवर्य इंद्रजीत भालेराव, परभणी आणि स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी विजय प्रकाशन, लाखे प्रकाशन आणि पिंपळापुरे प्रकाशनाचे प्रतिनिधी मनोगत व्यक्त करतील.     

    सायंकाळी ५ वा. वाचन चळवळ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त भीमाबाई जोंधळे, 'आजीचे पुस्तकांचे हॉटेल', नाशिक, अक्षर आनंद उपक्रमाचे विनोद शेंडगे, परभणी आणि 'रीडिंग किडा' या बाल वाचक घडविणाऱ्या उपक्रमाच्या प्रणेत्या डॉ. पल्लवी बापट, नागपूर यांच्या मुलाखती होणार आहे. सायंकाळी ६ वा. प्रा.श्रीकांत पाटील, 'आवडलेल्या कथा कथाकारांच्या शब्दात' हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

        २२ फेब्रुवारीला सकाळी ९. ३० वा. 'वाचकाने लिहिते होताना' या सत्रामध्ये डॉ. माधुरी मानवटकर व प्रसिद्ध नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी आपला लेखन प्रवास कथन करतील. सकाळी १०. ३० वा. 'मैफल कवितांची' या मैफलीत इंद्रजीत भालेराव आपल्या कवितांची मेजवानी सादर करणार आहेत. 

     महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशकांचे पुस्तक विक्री केंद्र यावेळी उपलब्ध राहणार असून रसिकांनी अधिकाधिक संख्येने या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ऍड. दुष्यंत देशपांडे प्राचार्य डॉ जयश्री शास्त्री आदींनी पत्रकार परिषदेत केलेे. 

   यावेळी पत्रकार परिषदेला प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय अंबुलकर, स्मिता धोपटे यांचे सह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments