छातीत तीव्र वेदना; महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाचले ठेकेदाराचे प्राण

 छातीत तीव्र वेदना; महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाचले ठेकेदाराचे प्राण


'मेजर हार्ट अटॅक'च्या क्षणी देवदूत ठरले महामार्ग पोलिस;







वरोरा (प्रती)महामार्गावर कर्तव्य बजावत असलेले पोलिस केवळ वाहतूक नियंत्रण किंवा अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत, तर प्रसंगी एखाद्याचे जीवनही वाचवू शकतात, याचा प्रत्यय शनिवारी आला. वरोरा-चंद्रपूर मार्गावर छातीत तीव्र वेदना सुरू झालेल्या एका वाहनचालकाला महामार्ग पोलिसांनी वेळ न दवडता रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


महामार्ग पोलिस मदत केंद्र चंद्रपूरचे पोलिस हवालदार संजय थेरे, पोलिस नाईक राकेश हेडाऊ व पोलिस नाईक वकील राठोड हे कोंढा फाटा परिसरात 'ऑपरेशन यू-टर्न' मोहिमेअंतर्गत कर्तव्यावर होते. त्यावेळी वरोरा येथून चंद्रपूरकडे कारने जात असलेले संकेत गुंजेवार (४०), व्यवसाय ठेकेदारी, रा. स्नेहनगर, गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. अत्यवस्थ अवस्थेत त्यांनी महामार्ग पोलिसांकडे धाव घेत मदतीची याचना केली. परिस्थितीचे गांभीर्य

ओळखून पोलिस हवालदार संजय थेरे यांनी एमटीए माईन येथील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील डॉ. वरगंटीवार यांच्या रुग्णालयात दाखल केले.


रुग्णालयात तपासणीनंतर संकेत गुंजेवार यांना 'मेजर हार्ट अटॅक' आल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करून उपचार सुरू केले. काही मिनिटांचा विलंब झाला असता परिस्थिती गंभीर होऊ शकली असती, असे डॉक्टरांनी सांगितले. वेळेत रुग्णालयात पोहोचवल्यामुळे त्यांचे प्राण वाचल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


या संपूर्ण मदतकार्याला महामार्ग पोलिस मदत केंद्र चंद्रपूरच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक माया चाटसे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल रुग्णाचे नातेवाईक तसेच डॉक्टरांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा एखादी व्यक्ती अडचणीत दिसली तरी लोक दुर्लक्ष करतात. मात्र, महामार्ग पोलिसांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि मानवतेची भावना समाजासाठी प्रेरणादायी आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीला वेळेवर मदतीचा हात दिल्यास एखाद्याचे जीवन वाचू शकते, हा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.

Post a Comment

0 Comments