पिंपळगाव मारोती येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण व कृषी दिंडी उत्साहात
वरोरा (प्रती): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव मारोती येथे दि. १ जुलै २०२६ रोजी कृषी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या पोलीस पाटील सौ. शोभा चंदनबटवे या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षक श्री. आशिष साठोणे सर तसेच अंगणवाडी सेविका सौ. रंजणाताई चिंचोलकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या रोपांचे संगोपन करून त्यांचे संवर्धन करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. "एक विद्यार्थी – एक वृक्ष" हा संदेश देत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
त्यानंतर गावातून कृषी दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी कृषी व पर्यावरण संवर्धनाबाबत घोषणाबाजी करत नागरिकांमध्ये जनजागृती केली. दिंडीत शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी कृषी, जलसंवर्धन, वृक्षलागवड आणि स्वच्छ पर्यावरणाचा संकल्प केला. कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

0 Comments