जन्मदाखल्यासाठी वरोराकरांना 'महिनाभराचा' वनवास !
'सीआरएस' पोर्टलच्या तांत्रिक त्रुटीमुळे जनता त्रस्त
वरोरा (प्रती)शासनाने डिजिटल कारभाराचा मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या नवीन 'सीआरएस पोर्टल' प्रणालीचा सामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. या प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि क्लिष्ट प्रक्रियेमुळे वरोरा शहरातील नागरिकांना मुलांच्या आपल्या जन्मदाखल्यासाठी तब्बल महिना ते दीड महिना वाट पाहावी लागत असून तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पूर्वी जन्म नोंदणीचा अर्ज केल्यानंतर नगरपालिका अथवा ग्रामपंचायत स्तरावर हा दाखला नागरिकांना लगेच उपलब्ध होत होता. मात्र, नवीन नियमांनुसार हा अर्ज ऑनलाइन केल्यानंतर तो थेट चंद्रपूर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या लॉगिनवर जातो. तिथे गेलेला 'ओटीपी' जोपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी स्वतः पाहत नाहीत आणि त्याला मंजुरी देत नाहीत, तोपर्यंत दाखला तयार होत नाही.
संपूर्ण जिल्ह्यातून दररोज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे हजारो ओटीपी जात असल्याने या दाखल्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. लहान मुलांचे शाळा प्रवेश, आधार कार्ड दुरुस्ती आणि इतर शासकीय कामांसाठी वेळेत दाखला मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जन्म दाखल्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे असलेला कामाचा ताण आणि त्यामुळे होणारा विलंब यामुळे दाखला मिळण्यास उशीर होत आहे.
जगदीश गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक, नगरपरिषद वरोरा
शासनाच्या या नव्या ऑनलाइन पोर्टलमुळे वरोराकरांची मोठी गैरसोय होत आहे. एका दाखल्यासाठी लोकांना दीड महिना ताटकळत ठेवणे चुकीचे आहे. जन्मदाखले पूर्वीप्रमाणेच थेट स्थानिक नगरपरिषद कार्यालयातून देण्यात यावेत आणि नागरिकांचा हा त्रास थांबवावा. सरकारने या त्रुटीत तातडीने सुधारणा करावी.
खेमराज कुरेकार, नगरसेवक, शिंदेसेना
0 Comments