गावकऱ्यांनी केले आठ दरोडेखोरांना जेरबंद
बेलगाव शेतशिवारातील घटना
वरोरा (प्रति)
तालुक्यातील बेलगाव शेतशिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीच्या ८ अट्टल दरोडेखोरांना स्थानिक धाडसी गावकऱ्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना मंगळवार, १४ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
१४ जुलैला रात्री १२.३० च्या सुमारास बेलगाव शिवारात पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीची राखण करीत असलेले शेतकरी श्रीकांत राऊत यांना काही संशयास्पद हालचाली - आढळून आल्या. ७ ते ८ अज्ञात इसम त्यांच्या मोटार सायकलींसह शेतशिवारात फिरत असल्याचे त्यांना - आढळताच राऊत यांनी तातडीने सचिन गांविडे यांना फोनवरून माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य - ओळखून गांविडे यांनी तातडीने बेलगाव आणि शेजारील कोंढाळा गावातील नागरिकांना एकत्र केले असता जगदीश खिरकर, विपीन
किन्हाके, अतुल सरपाते, आशीर्वाद तुरके, संजय शेरकुरे, नंदकिशोर झोडे, स्वप्नील पिंगळे, सुरेश तुराळे, श्रीकांत तुराळे आणि रवी देठे यांच्यासह अनेक गावकरी एकत्र येऊन त्यांनी बेलगाव शेतशिवाराकडे धाव घेतली.
गावकरी शिवारात पोहोचले असता त्यांना काही अनोळखी व्यक्ती पळताना दिसले. गावकऱ्यांनी पाठलाग करून आठ व्यक्तींना जागीच पकडले. दरोडेखोरांच्या धमकीला न घाबरता गावकऱ्यांनी आरोपींना पकडून ठेवले आणि त्यांची झडती घेतली. यावेळी आरोपी हिमांशू ताजने याच्या हातातील पोत्यात मोटारसायकलच्या शॉकअपचा स्टील रॉड, एक हातोडी, दोन पेचकस, एक लोखंडी रॉड, एक टॉर्च आणि बॅटऱ्या असे साहित्य आढळून आले. अधिक चौकशी केली असता, या टोळीने गुन्ह्यासाठी आणलेल्या चार मोटारसायकली बालाजी दरेकर यांच्या शेतात लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती लगेच वरोरा पोलिसांना दिली आणि
आरोपींसह मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.
पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांचा समावेश आहे. यामध्ये पोलिसांनी रामा सूर्यभान आत्राम (रा. गोडपुराडा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ), विकेश अशोक पवार (रा. गोडपुराडा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ), योगेश पडवाडी काळे (रा. गोपालनगर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ), अर्जुन हिराचंद भोसले (रा. गोपालनगर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ), निशेष देशकर फुलमाळी (रा. गोपालनगर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ), भोलू कवडू फुलमाळी (रा. गोपालनगर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ), हिमांशु महादेव ताजने (रा. तुमगाव,( ता. वरोरा )आणि गजानन पतुजी सेडामे (रा. तुमगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सचिन गांविडे यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे.

0 Comments