वरोरा डीबी पथकाला 'उत्कृष्ट गुन्हा उकल २०२६' पुरस्कार

 अवघ्या काही दिवसांत सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; वरोरा डीबी पथकाला 'उत्कृष्ट गुन्हा उकल २०२६' पुरस्कार


वरोरा (प्रती)चंद्रपूर जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील विविध भागांत हातचलाखी करून सोने-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या टोळीने वरोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही धाडसी चोरीची घटना घडविली होती. या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास करत वरोरा पोलिसांच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने अवघ्या काही दिवसांत या प्रकरणाची उकल केली.

तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि कसून तपासाच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवाईमुळे केवळ वरोराच नव्हे, तर जिल्ह्यातील इतर भागांतीलही अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासाला दिशा मिळाली. आरोपींना गजाआड करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने वरोरा डीबी पथकाचा 'उत्कृष्ट गुन्हा उकल २०२६' या मानाच्या पुरस्काराने गौरव केला. या प्रकरणाचा यशस्वी तपास करणारे डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) शरद भस्मे, तसेच पोलीस अंमलदार मनोज ठाकरे, सौरभ कुलथे, नितीन रायपुरे आणि विशाल राजूरकर यांना चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल वरोरा पोलिस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, गुन्हेगारांविरोधात प्रभावी कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वरोरा पोलिस सदैव कटिबद्ध असल्याचा संदेश या कामगिरीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Post a Comment

0 Comments