वरोरा पोलिसांची धडक कारवाई; बकरे चोरी प्रकरणाचा २४ तासात छडा
पाच बकऱ्यांसह कार, दुचाकी असा ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
वरोरा : तालुक्यातील मजरा (रै.) येथे गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा वरोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत तीन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरीस गेलेल्या पाच बकऱ्यांसह गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार व दुचाकी असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी मजरा (रै.) येथील किशोर अशोक कोल्हे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात पाच बकऱ्या बांधल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर गोठ्यातील पाचही बकऱ्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरी झालेल्या बकऱ्यांची किंमत सुमारे २५ हजार रुपये होती. याबाबत त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा क्रमांक ९२१/२०२६, कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच वरोरा पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. तसेच महामार्गालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी सुरज शिवगीरी सोळकी (वय २७, रा. इंदिरा नगर, अयोध्या नगर, चंद्रपूर), खुबलाल हिरासिंग ठाकूर (वय २५, रा. संजय नगर, दर्गा वॉर्ड, चंद्रपूर) आणि राकेश राजेंद्र महतो (वय ३८, रा. शाम नगर, आंबेडकर चौक, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून पाच बकऱ्या (२५ हजार रुपये), स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच १२ एफयू ८८१९ (५ लाख रुपये) आणि होंडा मोटारसायकल क्र. एमएच ३४ सीसी ४३५४ (४५ हजार रुपये) असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कष्टाने वाढविलेल्या आपल्या पाचही बकऱ्या परत मिळाल्याने फिर्यादी किशोर कोल्हे यांनी वरोरा पोलिसांच्या तत्परता, मेहनत आणि प्रभावी तपासाबद्दल समाधान व्यक्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि प्रभारी अधिकारी ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार तसेच पोलीस कर्मचारी सुखराज यादव, अमोल नवघरे, प्रशांत नागोसे, महेश गावतुरे, सौरभ कुलते, विशाल राजुरकर व मनोज ठाकरे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

0 Comments