1 कोटी 38 लाखांच्या फसवणुकीतील आरोपी इंदूरमधून अटकेत
वरोरा पोलिसांची धडक कारवाई : तांत्रिक तपासातून आरोपीचा ठावठिकाणा शोधला
वरोरा : तब्बल १ कोटी ३८ लाख
रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या सराईत आरोपीला वरोरा पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली. विनोद श्यामराव सोयाम (४०), रा. शिवनेरी नगर, देशपांडे पेट्रोल पंपामागे, वरोरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत आरोपीविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार नागपूर येथील अक्षय अमरचंद सोनी यांच्या तक्रारीवरून ८१ लाख ५० हजार रुपये, तर शिवकुमार रामचंद्र गुप्ता यांच्या तक्रारीवरून ५६ लाख ५० हजार रुपयांच्या रोकड फसवणुकीचा गुन्हा वरोरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांनंतर आरोपी पोलिसांना चकवा देत वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले होते. पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी वरोरा पोलिसांचे पथक तयारकरण्यात आले. या पोलिस पथकांनी तांत्रिक तपासासह गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले.आरोपी इंदूर शहरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने मध्य प्रदेश गाठले. तेथे नियोजनबद्ध सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षकईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल आणि वरोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार, पोलिस हवालदार रुपेश मुल्लेमवार, संदीप मुळे आणि पोलिस अंमलदार विशाल राजुरकर यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.

0 Comments