* मोफत धान्य लाभार्थ्यांची प्रतीक्षा वाढली*
*वरोरा तालुक्यात नोव्हेंबर महिन्याचे अन्नधान्य वितरण रखडले – लाभार्थ्यांत नाराजीची लाट*
वरोरा (प्रतिनिधी)
अन्नधान्याचे मोफत लाभार्थी नोव्हेंबर महिन्याच्या धान्यांच्या प्रतीक्षेत आहेत. महिन्याची ८ तारीख उलटून गेली तरी अद्याप धान्यवाटप सुरू न झाल्याने लाभार्थ्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
वरोरा शहरात तब्बल 13 स्वस्त धान्याचे दुकाने असून, संपूर्ण तालुक्यात अंदाजे 130 दुकाने कार्यरत आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जवळपास 35 हजार लाभार्थी कुटुंबे दरमहा या शासकीय धान्यावर अवलंबून आहेत. मात्र, या महिन्यातील धान्यवितरण विलंबित झाल्याने सर्वत्र संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
शासनाने लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे म्हणून खासगी कंत्राटदाराची नेमणूक केली असली तरी प्रत्यक्षात धान्य पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार अनेक लाभार्थी करीत आहेत . “गोडाऊनमध्ये धान्य उपलब्ध असूनही वितरण का होत नाही?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अन्नधान्य वितरण सुरू झाले असताना केवळ वरोरा तालुका मात्र या प्रक्रियेत मागे आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. अनेक कुटुंबांचे रोजचे जगणे या धान्यावर अवलंबून असल्याने त्यांच्यासाठी ही परिस्थिती गंभीर ठरत आहे.
लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अन्नधान्य वितरण निश्चित सुरू व्हावे, अशी मागणी तीव्रतेने पुढे येत आहे. ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे की शासन यंत्रणेतील समन्वयाचा अभाव, हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
सध्या वरोरा तालुक्यातील हजारो लाभार्थी हातात राशन कार्ड घेऊन स्वस्त धान्य दुकानांसमोर प्रतीक्षा करत आहेत — शासकीय यंत्रणेकडून त्वरित उपाययोजना करून तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

0 Comments