जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत आनंदवनच्या मूकबधिर शाळेचे नेत्रदीपक यश
वरोरा (प्रतिनिधी ) दि. 3 डिसेंबर 2025 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सर्वाधिक पारितोषिके प्राप्त करून आनंद मूकबधिर विद्यालय आनंदवनने नेत्रदीपक यश मिळवले.
दिव्यांगांच्या या स्पर्धांची जल्लोष 2025 अशी थीम ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पुलकित सिंह यांनी केले. या प्रसंगी जिल्हा सक्षमीकरण अधिकारी मा. धनंजय साळवे यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. प्रशासनातील अनेक अधिकारी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करून अंध , मूकबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद अशा प्रवर्गातील शाळकरी मुलांची स्पर्धेला सुरवात करण्यात आली.
मूकबधिर प्रवर्गात आनंद मूकबधिर विद्यालयातील 29 मुला- मुलींनी सहभाग घेतला होता. यात 8 ते 12 या वयोगटात 50 मी धावणे व लांब उडीत कु. ग्रेसी छत्रपती पेंदोर हीने प्रथम क्रमांक पटकावला. 13 ते 16 वयोगटात सुजल संजय ठाकरे , 100 मी धावणे, आयुष रामप्रसाद सरोज , लांब उडी व 200 मी धावणे, कमलकुमार येमुलवार ,गोळा फेक या प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केले. शिवम भारद्वाज, शिवानी गुरूनुले, दीप खोब्रागडे, धम्माई अवथरे, पियूष कोल्हे, प्रतिक्षा झाडे, गुंजन भट, मानसी पाटील, आदित्य भेंडारे, मुस्कान रहांगडाले यांनी वेगवेगळ्या खेळात व वेगवेगळ्या गटातून शाळेसाठी द्वितीय क्रमांकाची पारितोषिके खेचून आणली. या सोबतच कार्यक्रम स्थळी लावलेल्या विद्यार्थ्यांनी निर्मित कलावस्तुंच्या प्रदर्शनला भरपूर प्रतिसाद लाभला.
संध्याकाळी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यात मूकबधिर प्रवर्गात आनंद मूकबधिर विद्यालयाने सादर केलेले ' मै रहू या ना रहू , भारत रहना चाहिए।' हे समुह नृत्य सर्वोत्कृष्ट ठरले. तसेच विद्यार्थ्यांनी रैम्प वाॅक करून स्वनिर्मित कलावस्तूंचे प्रदर्शन केले.
विविध क्रीडा स्पर्धां, सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी मोलाचे सहकार्य दिले. कलाशिक्षिका कु. काजल मेंढे हीचे नृत्य संचालनात विशेष योगदान लाभले. या सर्व यशाला आदरणीय डाॅ.विकासभाऊ आमटे, डाॅ. सौ. भारतीताई आमटे यांचे आशीर्वाद लाभले. मा. कौस्तुभदादा, पल्लवीताई आमटे यांनी मुलांचे कौतुक केले.

0 Comments