वरोऱ्यात महायज्ञ व निशुल्क योग शिबिराचे भव्य आयोजन

 वरोऱ्यात महायज्ञ व निशुल्क योग शिबिराचे भव्य आयोजन




वरोरा (प्रतिनिधी):

आध्यात्मिक, मानसिक व शारीरिक आरोग्यासह अंतःशांतीचा लाभ नागरिकांना मिळावा, या उद्देशाने वरोरा शहरातील द्वारका नगरी आनंदवन चौक येथील हनुमान मंदिरात गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महायज्ञाला परमपूज्य भागवत मनीषी संत श्री मनीषभाईजी महाराज यांचे पावन मार्गदर्शन लाभणार असून, विविध संत-महात्म्यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. या महायज्ञात १५१ यज्ञकुंड प्रज्वलित होणार असून ५५१ जोडपी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महायज्ञात सहभागी होणाऱ्या भाविकांनी पूजेसाठी आवश्यक साहित्य – आरतीचे ताट, गडवा, पेला, चमचा, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, कापूर, बेलफूल, नारळ, पेढा, अगरबत्ती, अक्षदा, जानवे, फुलवात, १०० ग्रॅम तूप, दोन आसने, पाण्याची बाटली, पंचामृत व साखर सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यज्ञसामग्री हनुमान मंदिरात अवघ्या १०० रुपयांत पॉकेट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासोबतच दिनांक २०, २१ व २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत निशुल्क विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिरात श्री अनिवाळ, श्री हजारे, श्री गोल्हर, श्री मिलमिले, श्री जोगी, श्री सावळकर, श्री संचेती, सौ. भोयर, श्री जीवतोडे, श्री घूगल, श्री बडवे, श्री लांबट, श्री डरे, डॉ. तेला व डॉ. डोरलीकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या सर्व धार्मिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महायज्ञ आयोजन समिती द्वारका नगरी हनुमान मंदिर योग मंडळ वरोरा, पतंजली योग समिती वरोरा तसेच गोपाळ कृष्ण गृहनिर्माण सहकारी संस्था, द्वारका नगरी वरोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments