शेतीच्या अन् पैशाच्यावादातून रक्तरंजित शेवट; मुलाकडूनच पित्याची निर्घृण हत्या; वरोरा हादरले

 शेतीच्या अन् पैशाच्यावादातून रक्तरंजित शेवट; मुलाकडूनच पित्याची निर्घृण हत्या; वरोरा हादरले








वरोरा (प्रतिनिधी): शहरातील मेहता हॉलजवळील ‘चीरघर’ प्लॉट परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. शेती व पैशांच्या वादातून एका मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जीवतोडे (वय ५८ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव असून सदर घटना ही मंगळवारच्या रात्रीच्या वेळेस साडेनऊ वाजता घडली पियुष उर्फ गोलू जीवतोडे असे आरोपी मुलाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून वडील आणि मुलामध्ये शेतीच्या व्यवहारांवरून व पैशांच्या देवाणघेवाणीवरून सतत वाद सुरू होते. मंगळवारी हा वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात गोलूने वडिलांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

या गंभीर जखमांमुळे नामदेव जीवतोडे यांना तातडीने उपचाराकरिता वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वडील गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने वडील स्लॅबवरून पडून जखमी झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टरांना सुद्धा स्लॅब वरून  पडल्याची माहिती आरोपीने दिली. वरोरा पोलिसांना सदर घटनेची माहिती होताच वरोरा ठाणेदार,पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के डीबी प्रमुख सपोनि शरद भस्मे, सपोनी मोरे घटनास्थळी दाखल झाले.

 पोलिसांनी संशयाच्या आधारे सखोल तपास करत तांत्रिक पुरावे गोळा केले असता, ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत अटक केली आहे.

या घटनेमुळे वरोरा शहरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नातेसंबंधांतील ताणतणाव किती टोकाला जाऊ शकतो याचे हे भयावह उदाहरण समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments