गोदामातून दोन लाखाची सरकी लंपास
वरोरा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खांबाडा उपबाजार गोदामातून तब्बल पावणेदोन लाख रुपये किमतीची सरकी चोरीला गेल्याची घटना गुरुवारी (दि. ११) उघडकीस आली. २४ तास खासगी सुरक्षारक्षक तैनात असतानाही ही चोरी झाल्याने बाजार समितीच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
येनसा शिवारातील नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या श्री बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीज जिनिंग व प्रेसिंग युनिटच्या वतीने खांबाडा उपबाजार गोदामात सरकी साठवून ठेवण्यात आली होती. अज्ञात चोरांनी गोदामातून ५० किलो वजनाचे एकूण ८० पोते सरकी चोरून नेली. बाजारभावाप्रमाणे या चोरी झालेल्या सरकीची किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे. परिसरात २४ तास खासगी सुरक्षा रक्षक तैनात असतानाही चोरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर माल कसा लांबवला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.
0 Comments