दारू पुरवठ्याचे केंद्र अधिकृत शॉपच? सट्टापट्टीच्या मोरक्यांवर कारवाईची मागणी
वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा शहरात अवैध दारू विक्री आणि सट्टापट्टीच्या व्यवसायाला पुन्हा एकदा उधाण आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. शहरातील अधिकृत देशी-विदेशी मद्यविक्रीचे एकमेव दुकान असून काही किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या दारूचा पुरवठा करीत असल्याचा आरोप जनतेकडून होत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे वाढल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळीही काही किरकोळ विक्रेत्यांना देशी व विदेशी मद्याचा पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी बेकायदेशीर मद्यविक्री सुरू आहे. परिणामी, वरोरा शहरातील विविध वॉर्डांमध्ये अवैध दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांकडून शहरात सुरू आहे.
दुसरीकडे, सट्टापट्टीच्या व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात बळ मिळाल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागांत सट्टापट्टीचे व्यवहार राजरोसपणे सुरू असल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे, सट्टापट्टीचा अवैध व्यवसाय चालवणाऱ्या किरकोळ एजंटांवर कारवाई होत असली तरी या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार मात्र कारवाईपासून दूर असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून काही सट्टा चालकांनी या व्यवसायातून मोठी आर्थिक संपत्ती उभी केल्याची चर्चा असून, त्यांच्यावर ठोस कारवाई न झाल्याने अवैध धंद्यांना खतपाणी मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच अवैध दारू विक्री आणि सट्टापट्टी या दोन्ही व्यवसायांमुळे सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यामुळे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून अवैध दारूचा पुरवठा करणारे, बेकायदेशीर विक्री करणारे तसेच सट्टापट्टीचे मुख्य सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या अवैध व्यवसायांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 Comments