१०० मिमी पावसाशिवाय पेरणीची घाई टाळावी

 १०० मिमी पावसाशिवाय पेरणीची घाई टाळावी


तालुका कृषी विभागाचे आवाहन




वरोरा : यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे पावसाचे वितरण अनियमित होणे, पावसात मोठा खंड पडणे तसेच जिल्ह्यातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, १०० मिमी पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी केवळ पहिल्या पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नये, असे आवाहन वरोरा तालुका कृषी विभागाने केले आहे.


तालुक्यात सद्यस्थितीत केवळ २९.६० मिमी पाऊस झाला आहे. खरीप पिकांच्या निरोगी उगवणीसाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस होऊन जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे. जोपर्यंत १०० मिमी पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. सुरुवातीच्या पावसानंतर हवामानात दीर्घ खंड पडल्यास नव्याने उगवलेली पिके जळून


खाक होतात. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवून बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च वाया जाण्याची भीती असते. शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाज, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाचा नियमित आधार घ्यावा. कमी कालावधीत येणाऱ्या, दुष्काळ सहिष्णू वाणांची निवड करणे, बीजप्रक्रिया करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन यासारख्या उपाययोजना कराव्यात. पेरणीपूर्वी जमिनीची तपासणी करून मृदा आरोग्य पत्रिकेनुसारच खतांचा संतुलित वापर करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कापूस उत्पादकता अभियान


कृषी विभागामार्फत तालुक्यात 'कापूस उत्पादकता अभियान' राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयसीएम तंत्रज्ञान (२००६० सें.मी.), क्लोजर लागवड तंत्रज्ञान (९००३० सें.मी.) आणि सघन कापूस लागवड तंत्रज्ञान (१०५०४५ सें.मी.) या आधुनिक पद्धतींनी कापूस लागवड नियोजन आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ बियाण्यांची पाकिटे व इतर जैविक निविष्ठा मोफत दिल्या जाणार आहेत. लाभ घेण्यासाठी शेतकरी गटांनी अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


पावसाअभावी शेतकरी चिंतेत


शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ बियाण्यांची पाकिटे व इतर जैविक निविष्ठा मोफत दिल्या जाणार


अहेरनवरगाव : मृग नक्षत्र संपून आद्रा नक्षत्राला सुरुवात झाली असून आकाशात काळे ढग, विजांचा कडकडाट व मेघगर्जना होत आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी वर्ग पावसासाठी चातकासारखी वाट पाहत आहे. पाऊस लांबल्यामुळे कडक उन्हाचा तडाखा बसून शेतकऱ्यांचे धानाचे पन्हे वाळू लागले आहेत. हजारो रुपये खर्च करून टाकलेले पन्हे नष्ट झाल्यास पुढील भविष्य कसे जगावे, अशी भीती बळीराजाला सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आवत्या धानाची पेरणी व शेतीच्या हंगामाला सुरुवातही केलेली नाही. बियाणे विकत घेऊन वाट पाहत आहे. पाऊस न पडल्यास महागाईच्या काळात उदरनिर्वाह कसा करावा, मुलाबाळांचे शिक्षण आणि घरगुती कार्यक्रम कसे करावेत, या विवंचनेत शेतकरी व शेतमजूर सापडला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आता मुसळधार पावसाकडे लागले आहे.

Post a Comment

0 Comments