वरोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १३ दुचाकी जप्त, मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

 वरोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १३ दुचाकी जप्त, मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश




(वरोरा प्रती)वरोरा शहरात सातत्याने घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना अखेर वरोरा पोलिसांनी मोठा आळा घालत सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत १३ चोरीच्या मोटारसायकली जप्त करत तीन आरोपींना अटक केली असून, तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वरोरा पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

४ जुलै २०२६ रोजी वैष्णो नगर, वरोरा येथील अमोल दयाराम भोग यांच्या मालकीची एमएच-३४ बीके-५५२७ क्रमांकाची सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद भस्मे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान शहरातील ५० तसेच नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपी हेमंत विनोद चौधरी (रा. शिंगोव गोटमाडी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) आणि सुरज एकनाथ उमरे (रा. दहेगाव, ता. वरोरा) यांनी वरोरा शहरातून चोरी केलेल्या ११ मोटारसायकलींची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी वर्धा जिल्ह्यात नेण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

तपासादरम्यान प्रमोद रामकृष्ण हेपट (रा. खांजी वॉर्ड, वरोरा) हा चोरीच्या मोटारसायकलींसाठी बनावट आरसी तयार करून देत असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून बनावट आरसीसह दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

या कारवाईत पोलिसांनी १३ मोटारसायकलींसह एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा छडा लावण्यात मोठे यश मिळविले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद भस्मे व वरोरा पोलिस ठाण्यातील विशेष तपास पथकाने केली.

Post a Comment

0 Comments