कल्याणेश्वर गणेश मंडळाच्या पुढाकारातून अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त श्रमदान

 कल्याणेश्वर गणेश मंडळाच्या पुढाकारातून अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त श्रमदान

पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांचा प्रत्यक्ष सहभाग; एक तास समाजासाठी उपक्रमाचे कौतुक




वरोरा : प्रतिनिधी

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कल्याणेश्वर गणेश मंडळ, कॉलरी वॉर्ड, वरोरा तथा स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १८ जुलै) स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा परिसरात श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झालेल्या उपक्रमात युवकांनी शाळा परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

या उपक्रमाला वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी प्रमुख उपस्थिती लावत प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेतला. युवकांनी समाजोपयोगी कार्यासाठी पुढाकार घेणे ही अत्यंत सकारात्मक बाब असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच एक तास समाजासाठी या संकल्पनेचे त्यांनी विशेष कौतुक करत अशा उपक्रमांना सातत्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आशिष घुमे यांनी सांगितले की, एक तास समाजासाठी या मोहिमेची सुरुवात १८ जुलैपासून करण्यात आली असून आठवड्यातील एक दिवस समाजहिताच्या कार्यासाठी देण्याचा संकल्प युवकांनी केला आहे. श्रमदान, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला वरोरा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा तेलतुंबडे, नगरसेविका मनिषा संजय दानव तसेच नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे निरीक्षक भूषण सालवटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून युवकांचा उत्साह वाढविला आणि उपक्रमाचे कौतुक केले.

या श्रमदान मोहिमेत कल्याणेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष शंकर आत्राम, सुनील इंगळे, चेतन बुरडकर, ओम मोहिनकर, विकास कांबळे, तुषार किनाके, मनोज कामटकर, अमित टेकाम, चेतन बुरडकर तसेच वॉर्डातील आकाश कोडापे, नेहाला सोयाम, अजय बावणे, मयूर ठाकरे, शुभम कोवेकर, रणजीत कुंभरे, राहुल बावणे यांच्यासह अनेक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments