वरोरा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ४१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वरोरा ( प्रती )चंद्रपूर जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत वरोरा उपविभागीय स्तरावर बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरासाठी नागपूर येथील जीवन ज्योती ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते. शिबिरात एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक बॅग तसेच नाश्त्याचे वाटप करण्यात आले.
शिबिरादरम्यान नागरिकांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आली. यामध्ये रक्तदाब (बी.पी.), हिमोग्लोबिन, रक्तगट यासह विविध प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला सहकार्य केले.
रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असते. भविष्यातही अशाच प्रकारच्या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
हे रक्तदान शिबिर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments